संभ्रम

खळखळत हसणं असावं तिचं कि,
गालातल्या गालातल खुद्कन हसु – हा संभ्रम आहे.
***
तिची कळी पटकन खुलावी,
कि नाकाचा शेंडा लालंच असावा – हा संभ्रम आहे.
***
गालावर ती खिळवणारी खळी असावी,
कि ती दिलखेचक निमुळती हनुवटी – हा संभ्रम आहे.
***
मुक्त, स्वच्छंदी उडणारी बट असावी,
कि मानेवर रुळणारे कुरळे केस – हा संभ्रम आहे.
***
हाकेला मिळणारा तो मधाळ हुंकार असावा,
कि तोंड भरून दिलेला प्रेमाचा प्रतिसाद – हा संभ्रम आहे.
***
न ढळणारी भेदक नजर असावी की,
चाळा करणाऱ्या अंगठयाकडे झुकलेले डोळे – हा संभ्रम आहे.
***
पण एका गोष्टीचा मात्र संभ्रम नाहीये,
ती माणूस म्हणून मनमिळाऊ आणि प्रेमळच असावी.
— @pbkulkarni